Monday 12 October 2020

पितृशोक

माझे वडील १९८४ साली मी सहा वर्षाचा असतांना धनुर्वाताने मृत्यु पावले. माझी लहान बहीण १.५ वर्षांची होती. आई २३ व्या वर्षी विधवा झाली. त्यानंतर अशी अनेक दुःख आली जी कुठेच व्यक्त करु शकत नाही. त्या जखमा अजुनही मन उद्गविन्न करतात. माझी लहानपणीची मनस्थिती व वडीलांच्या मृत्युने माझ्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम मांडला आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी बाप गमावणे हे प्रचंड डोईजड दुःख असते. तो मुलगा रडतो. परंतु त्याला मृत्यु हा कायम स्वरुपी आहे हे कळत नसते. कारण त्याला मुळात मृत्यु कळत नसतो. तो रडतो कारण त्याच्या सभोवती सर्व आक्रोशात रडत असतात. ती भावना त्याला दुर्दैवी परिस्थितीत स्वतःशीच झगडायला लावते, कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी. हंबरडा फोडुन मोकळा करण्यासाठी. त्या बालकास मृत्यु येण्याची प्रक्रिया किंवा आजार व त्यातुन त्याचे मृत्युत होणारे रुपांतर कळत नसते. त्याची समज मृत्यु नंतर होणाऱ्या अंत्ययात्रेस समजण्याइतपत देखील नसते. सतत गतीशील असलेला बाप हालचाल न करणारा निपचित पडलेला पाहुन त्याच्या कोवळ्या मनाला मोठा धक्का बसतो. पुर्वी ज्या सर्व गोष्टीसाठी तो वडीलांच्या दिशेने पाहायचा, पळायचा, त्यासाठी आता कुठे पाहायचे, पळायचे हे न कळणे काळीज पिळवटुन काढते. त्याची आई दुःखांचे सांत्वन करण्यापलीकडे गेलेली असते आणि वडील कुठेही दिसत नाहीत. ही परिस्थिति पाहुन ते पोर त्याच्या मनाचे दार घट्ट लावुन घेतो. त्याचे डोळे त्या अंधारलेल्या मनात काहीतरी शोधत असतात. मात्र नेमके काय शोधतोय, हे त्याचे त्यालाच माहीती नसते. ते पोरं त्याला पडलेले प्रश्न अपरिपक्व मनाची मदत घेत सोडवायचा प्रयत्न करते. वडीलांच्या जुन्या आठवणींचा ओघळ त्याच्या मनावर व गालावर येतो. असेही आता वडीलांच्या नविन काही आठवणी तयार होणार नसतात. त्यातच वडीलांच्या मृत्युनंतर त्याच घरात राहणे अशक्य असल्याने त्याचे घर, शाळा बदलते. त्या घटना त्याला अजुन असुरक्षिततेची भावना व स्वभावात चिडचिड देतात. आयुष्यात एक श्वास सोडला तर कुठल्याही गोष्टींवर नियंत्रण राहीलेले नसते. डोळेही परवानगी न घेता वाहतात. त्याच्या आईची मांडी लहान बहीणीस सांभाळण्यात गुंतलेली असते. आणि ते पोरं वयाच्या ६ व्या वर्षी प्रौढत्वाचे ओझे वाहते. त्याच्या मनात एका प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. जो सतत त्याला स्वताःत काही तरी कमतरता आहे हे बोचत असतो. ती अशी कमतरता की ज्यात त्याचा काही दोष नाही.  त्याची चोहोबाजुला असणाऱ्या गोष्टींवर श्रद्धा जमायला लागते. परंतु त्याला हे ही सतत जाणवत असते की ही श्रद्धा खुप पोकळ आहे. आपल्या आयुष्याबद्दलच्या आत्मविश्वासाएवढीच पोकळ. तो पोकळ आत्मविश्वास, जो त्याच्या वडीलांच्या आयुष्याबाबतीत सर्वांना होता व फोल ठरला. ते सलणारे दुःख, अगदी लहानपणी पळतांनाही पायाला कुणीतरी ओझे बांधले आहे ही भावना देते.  त्याने कठोर परिश्रमाने अभ्यास केला परंतु त्याला जाणिव होत होती की क्षमता कुठेतरी कमी पडत आहे. जेव्हा पुढे जाण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल त्याला एका कमतरतेची जाणिव करुन देते तेव्हा ती प्रगती अजुन अवघड होत जाते. मग ती कमतरता भरुन काढण्याचा तो अजुन कष्ट करुन प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांना कधी यश येते तर कधी अपयश. परंतु त्या प्रयत्नात त्याच्या आयुष्यात पडलेल्या भगदाडाला, पोकळीला न भरुन काढता फक्त वरवर लिंपणे सुरु होते. ते लिंपण काही प्रमाणात दुःखावर फुंकर घालत असते. प्रत्येक येणारे यश त्याच्या मनाला थोडी सुखाची झालर लावते. पण ती पोकळी, भगदाड कशानेच भरुन निघत नाही. मोठा होतांना भावंडांपुढे चांगले उदाहरण बनण्याचे ओझे नेहेमी त्याच्या डोक्यावर राहाते. त्यामुळे वागण्यातुन त्याला वेगळं राहावे लागते. त्या वागण्यातुन त्याच्या व्यक्तिमत्वास रुप येते परंतु ती आतली पोकळी सदैव कमजोरीची जाणीव मनाला देते. त्याच्यातले लहान मुल, बालपण हे निखळून पडते. मग तो त्या भावनावेगाचा उपयोग स्वतःला सतत पेटते ठेवण्यास करतो. परंतु समाज त्याच्यावर दयेचे ओझे टाकत असतो. त्यातुन बाहेर येणे अवघड जाते कारण दयेच्या ओझ्यातुन  केवळ victim शोषीत पिडीत तयार होतात. दयाभाव तुम्हाला परिस्थिति नियंत्रणाबाहेर आहे हे दर्शवते तर प्रेरणा परिस्थिति वर विजय मिळवण्यासाठी झगडायला शिकवतात. लोकांनी  त्याच्याप्रती दाखवलेला  दयाभाव त्याच्यातील आत्मविश्वासाला छिद्र पाडतो.  मग तो स्वतःला स्वतःपासुन लपवण्याचा प्रयत्न करतो. आणि जगासाठी स्वतःचे वेगळे चित्र रंगवतो. जेणे करुन इतरांना त्याच्या परिस्थितीची जाणिव होणार नाही.  त्याला माहीती नसते की कुठलेही औषध, अगदी काळदेखील, ही जखम भरु शकणार नाही. कदाचित जखम भरेल पण निर्माण झालेली पोकळी नक्कीच भरुन निघणार नाही. त्याचे ते कोवळं वय त्याला पोकळी ना त्यावरील औषध, कशाचीच समज देत नाही. त्याचे आयुष्याच्या मार्गावर पुढचे पाऊल टाकणे चालु असते. मात्र कुठलेही ध्येयाचे ठिकाण समोर नसते. एका मागोमाग मैलाचे दगड पार करणे हेच अव्याहत चालु असते. त्याच्या नजरेसमोर येणारी वडिलांचा हात धरुन चालणारी लहान मुले देखील त्या पोकळीची आठवण करुन देण्यास पुरेसे ठरतात. त्याला आठवण करुन देतात की आता त्याच्या चुकांची जबाबदारी घेणारा कुणीही नाही. त्याने केलेल्या चुकांपासुन काय व कसे शिकायचे हे सांगणारा आता नाही. धावण्याच्या स्पर्धेत आकांत करुन पळत पहीला नंबर जरी आला तरी आनंदाने  व अभिमानाने उचलणारा कोणी नाही.  संकटात कसे लढायचे हे बोट धरुन शिकवणारा तो बापाचा बळकट हात  कुठेही नाही. स्वतःला सावरण्यासाठी तो हात स्वतःलाच बनायचा आहे. ती कणखर प्रवृत्ती आतुन उपजते. सकारात्मक प्रवृत्ती असलेली मुले सुधारतात व नकारात्मक वृत्ती असलेले रसातळाला जात आयुष्याची माती करतात. जगतांना त्याला नेहेमी जाणवत असते की मिळालेल्या यशात बिकट परिस्थितीचा फार मोठा वाटा आहे. त्यातुन काबाडकष्ट करत अभ्यासाची सवय लागते. प्रारब्धाने जे नाकारले ते परिश्रमातुन साकारण्याचे यत्न सुरु होतात. या प्रयत्नात प्रत्येक वेळी पोटात कळ चमकुन काहीतरी हरवल्याची आठवण करत असते. त्याला छोट्यातली छोटी गोष्ट देखील रडायला भाग पडेल इतके हळुवार भावनीक मन होते. कधी रडु कोसळेल याचे अंदाज बांधणे अवघड होते. अश्रुंमागचे  खरे कारण व जखम जी कधीच भरुन येणार नाही ती त्याला समजते पण उमजत नाही. जेव्हा तो नसलेल्या वडीलांवरच्या आधार पलिकडे जात मोठा होतो, तेव्हा ती जखम त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. ती जखम आता क्वचितच रक्त भळभळणारी किंवा खुपणारी होते. 

जेव्हा तो स्वतः एका मुलाचा बाप बनतो तेव्हा ती जुनी जखम पुन्हा नजरेसमोर एका वेगळ्या रुपात येते. तेव्हा तो देवाला शरण जात, त्या पोटी जन्मलेल्या मुलाला कधी स्वतःसारखं अकाली अनाथ, पोरकं नको करुस हेच मागणे मागतो. कारण ते कठिण आयुष्य खचितच जगण्यालायक होतं. 
पण आता ते मिळालेले पितृस्थान त्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवते. मृत्यु हा स्वच्छ सुर्यप्रकाशाइतका अटळ आहे हे मनाला ठाऊक असते, पण जो क्षण जगायचा आहे, तो जगतांना शेवटचा असेल इतका मनसोक्त जगायचा हे मनात निश्चित होत जाते. त्या मनातील एका दुखऱ्या भागाला बऱ्याचदा वाटते की मुलाला त्याच्या बापाशिवाय जगण्यालायक बनवावे. कठोर शिस्तीतुन आत्मनिर्भर करावे. पण त्या मनाला हे देखील ठाऊक असते की वडीलांच्या नसण्याने होणारी पोकळी कधीच न भरुन येणारी असते. त्यासाठी कुठलीही तयारी करणे अशक्य आहे. मुलावर किती काळ छत्र राहील हा निर्णय तो प्रारब्धावर सोडुन, प्रत्येक दिवस मनसोक्त खंतविरहीत जगायला लागतो. चांगल्या आयुष्याकडे वाटचाल करत जगण्याचा अर्थ कळण्यासाठी जगायला लागतो. ते जगणे अविरत चालु राहते. केवळ त्यालाच माहीती असते त्या जगण्याची मोजलेली किंमत, झालेल्या जखमा व त्यातुन भळभळलेले अश्रु.

© Rahul Karurkar

Friday 7 February 2020

निरामय_आरोग्यवर्धिनी - ४जिम किंवा खेळ (gym vs sports)


हा विषय जरा आश्चर्यचकित करणारा आहे. परंतु या घडीला त्याचे खुप विशेष महत्व आहे. कारण आपण आता आरोग्यात कृतीशील बदल घडवणार आहोत. बऱ्याच संकल्पांची बंधन स्वतःला, जीवनशैलीला (lifestyle) घालणार आहोत. आपण आरोग्याचे तिन भाग केले त्यात मानसिक आरोग्यास प्रथम स्थान दिले. कारण मानसिक आरोग्य नसेल तर जिम मधे कसरत करुन कमावलेली शारिरीक शक्ती ही निस्तेज, दिशाहीन अस्थिर असते. जिममधे तुम्ही तुमचे मसल्स बनवु शकता परंतु रिफ्लेक्सेस (reflex, प्रतिक्षिप्त क्रिया) सुधारु शकत नाही. Reflexes म्हणजे तुमच्या मेंदुकडुन प्रत्येक बाह्य घटनेसाठी दिली जाणारी प्रतिक्रिया, त्यासाठी शरीराला दिली जाणारी आज्ञा आणि शरीराची त्या आज्ञेनुसार हालचाल. उदा: तुमच्या डोळ्यात कोणी बोट घातले तर लगेच तुमची पापणी बंद होते. किंवा तुमच्या दिशेने कोणी चेंडु फेकला तर तो तुम्ही झेलण्यासाठी जी हालचाल तत्परता दाखवतात त्याला रिफ्लेक्सेस म्हणतात. अशा सगळ्या रिफ्लेक्सेस वर दोनच गोष्टी काम करतात. एक योग दुसरे म्हणजे खेळ. योगात डेव्हलप होणारी शरीराची तत्परता ही अचाट सर्वोत्कृष्ट असते. कारण योगशिक्षा नुसते इंद्रीयांचेच नाही तर मनाचे नियमन करुन तुम्हाला एकचित्त होण्याचा सराव देते. तिथे लवचिक शरीर हा त्या नियंत्रणाचेच एक अंग म्हणुन आसनांचा सराव केला जातो. त्यामुळे कराटे, ताय-ची, काठी, तलवार चालवण्याचे अनेक खेळ यांत ध्यान, एकाग्रता यांना महत्व आहे. शरीराच्या मसल्स पेक्षा रिफ्लेक्सेस महत्वाचे. त्यामुळे तुमचे शरीर चपळ तल्लख तत्पर राहते. प्रत्येक अवयव हा मेंदुकडुन येणारी आज्ञा झेलतो. तिथे तो तक्रार करत नाही की माझा हात पोहोचत नाही किंवा पाठ, मान वाकत नाही. जिथे कमकुवत शरीर असते तिथे हा प्रश्न येतो. जिथे मेंदुची आज्ञा वाहणारे न्युरॉन्स ढील्ले पडतात तिथे रिफ्लेक्स अजुन कमकुवत आढळतात. तुमची खेळातली गती रिफ्लेक्सेस सुधरण्यास मदत करते. उदाहरणाखातर बँटमेंटन खेळ घ्या. त्यात तुमच्या हाताची खांद्याची डोळ्याची त्यासोबत लक्ष देता पायांची समन्वयीत हालचाल होते. तुम्ही शटल प्रतिस्पर्धीच्या दिशेने मारतात. तसेच स्विमिंग, तायक्वांदो, टेनिस, कबड्डी, खो खो, इतर असंख्य खेळात ही समन्वयीत हालचाल तुमच्या रिफ्लेक्सेस मधे प्रचंड सुधारणा करते. खेळ खेळतांना तुमचा उत्साह हा जास्त असतो कारण तिथे मजा येते. प्रतिस्पर्धी असतो. खेळीमेळीचे वातावरण असते. मैत्री वाढते. तुमच्या मानसिक आरोग्याला हातभार लागतो. खेळात होणाऱ्या हालचाली काही उपकरणं जीममधे हुबेहुब करतात. उदाहरणार्थ रोव्हींग (नाव वल्हवणे) मशीन. परंतु त्यात तुम्हाला फक्त ते मसल्स विकसीत करण्यात मदत देतील. तिथे तेवढे चैतन्य लागणार नाही. जे खरी नाव वल्हवण्याच्या शर्यतीत तुम्हाला मिळेल. स्पर्धात्मक वातावरण तर जिममधील रोव्हींगमधे अजिबात नसणार. खिलाडु वृत्ती विकसीत होण्यामागे स्पोर्टसमधे असलेले अनेक महत्वाची गुण आहेत. ते जिममधे मिळणे शक्य नाही. परंतु जिम वाईट आहे असे नाही. ज्यांना त्यातुन प्रेरणा मिळते त्यांनी तो अवश्य करावा. मात्र जिममधुन कसलेल्या शरीराची एखाद्या खेळात/स्पोर्ट्समधे सहभाग घेऊन समिक्षा करावी. स्पोर्ट्स तुमच्या शरीराला शक्ती लवचिकता यासोबत समन्वय देखील देतो. एका स्पोर्ट्समधे होणाऱ्या हालचाली बऱ्याच प्रकारच्या असल्यामुळे त्या जिममधे हुबेहुब करणे जवळपास अशक्य असते. तसेच तुमची सांघिक (team games) खेळ खेळल्यामुळे इतरांशी होणारे संभाषण, इतरांना कसा सपोर्ट करायचा, पार्टनरचे दोष कव्हर कसे करायचे हे शिकवते. हे आयुष्यात फार महत्वाचे आहे. स्पोर्ट्स किंवा मिलीट्री मधुन रिटायर होणारे लोक यांचा जगण्याचा दृष्टीकोन इतर लोकांपासुन वेगळा असतो. दोघांची सहनशक्ती तसेच लढाईत टिकुन राहण्याचा चिवटपणा हा वाखाणण्याजोगा असतो. कुठुन येतो हा गुण? हा स्पोर्टस खेळुनच येतो असे माझे स्पष्ट मत आहे. मिलिट्रीत देखील स्पोर्ट्सला भरपुर प्राधान्य दिले जाते. ही मंडळी कधीही पराजय मानणारी असतात. शारिरीक मेहनतीसोबत हे गुण स्पोर्ट्समधे मिळत असतील तर प्रत्येकाने स्पोर्टस का करु नये? विचार कराल? तुम्हाला नुसते मसल्स हवेत का तुम्हाला त्यासोबत, endurance( सहनशक्ति), never say die spirit( पराजयातुन जय प्राप्त करण्याची स्फूर्ति), भागीदारी (partnership), चिवटपणा, खिलाडुवृत्ती हे गुण देखील हवे आहेत


जिम हा concept कदाचित स्पोर्ट्स खेळणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणुन निर्माण झाला असावा. कदाचित त्याचे काही इतर फायदे असतील. परंतु आपल्याला यथाशक्ती खेळामधे भाग घेऊन त्याचा आरोग्यास समग्र फायदा करुन घ्यायचा आहे


शेवटी लेख संपवतांना तुम्हाला खेळांचा अजुन एक फायदा सांगतो. तुम्ही विचार करा की तुमच्या जोडीदाराबरोबर किंवा तुमच्या अपत्याबरोबर बॅडमिंटन किंवा टेनिस खेळत आहात. ह्या वेळेचा तुमच्या नात्यावर किती महत्वाचा चांगला परिणाम होईल? तुमची एकमेकांना मदत तर होईलच परंतु ह्या आरोग्याच्या प्रयोगात तुम्ही कुटुंबाची वीण घट्ट कराल. बालपणीचे मित्रमैत्रीण यांच्याबद्दल एक विशेष जिव्हाळा, आपुलकी, प्रेम असण्यामागे एक कारण हे ही असते की ती खेळात जुळलेली नाती असतात. तुमचे ते खेळगडी, पार्टनर असतात. आपले दुःख, चिंता स्पोर्ट्स खेळतांना विसरणे जितके सोपे सहज आहे तितके सहज ते जिममधे वजनं उचलतांना होणे सोप्पे नाही. काही लोकांना जिम करतांना हे शक्य होत असेलही. पण दोघांमधे बरीच तफावत तुम्हाला जाणवेल


गृहपाठ:

  1. कुठल्याही खेळासाठी योग्य तयारी (शुज, योग्य पेहराव, गुढघ्याची कॅप, घोट्याची कॅप) तसेच खेळापुर्वी warmup शिकुन तो अवश्य करा. आवश्यक असल्यास ट्रेनिंग.
  2. तुमचे आवडते खेळ आठवा त्याची नोंद करा.
  3. तुमच्या घराजवळ कुठे स्पोर्ट्स ॲक्टिविटी होतात ते शोधा.
  4. जिथे कोचिंग लावता येईल तिथे कोचिंग जिथे जोडीदाराबरोबर किंवा अपत्यांबरोबर गेम खेळता येतील तिथे तसा प्लान आखा.
  5. कुठल्याही गोष्टीची लाज बाळगु नका. मुलांना समजा ताईक्वांदो किंवा बॅडमिंटन क्लास लावला असेल तर त्या कोचला विचारा. तुम्हालाही शिकायचे आहे म्हणा. पाठपुरावा करा जेणेकरुन तुम्हाला शिकवायला ते तयार होतील
  6. आठवड्यातून एक दिवस मित्रांना भेटून चहापित गप्पा करण्यापेक्षा कुठला मैदानी खेळ खेळता येतो का पहा
  7. ज्यांना माऊंटेनियरींग करावे वाटते त्यांनी किल्ले चढण्यापासुन सुरवात करा. महिन्यात किल्ले ठरवा
  8. स्वीमिंग करता येईल त्यांनी जरुर हा क्लास करावा. त्यात गुढघ्यांना त्रास होता छान व्यायाम होतो.
  9. मित्रांसोबत किंवा जोडीदाराबरोबर विकेंडला बॅडमिंटन कोर्ट बुक करुन खेळा. टिम तयार करता आली तर पहा



वरील गृहपाठ केल्यावर आपण पुढील आरोग्यविषयक ठोस पाऊल उचलणार आहोत.


वरील गृहपाठाचा आपण आपल्या दिनचर्येत तसेच आरोग्य बदलण्याच्या प्रक्रियेत उपयोग करुन घेणार आहोत.


#निरामय_आरोग्यवर्धिनी


आरोग्यवर्धिनी सेवक

© राहुल करुरकर