Wednesday, 23 October 2019

शक्तिचा गुणाकार : योगरहस्य

आपण ऋषी, मुनी, योगी, राजे, संन्यासींच्या अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथा ऐकतो. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे, हे महात्मे अनेक वर्षे, अगदी १००,१५० वर्ष सहजतेने जगत असत. त्या संपुर्ण जगण्यात त्यांचे शरीर व मन हे देखील चिरतरुण मनुष्यासारखे असायचे. हे असे कसे बरं होत असेल? काय सिद्धी असेल ही? निसर्गनियमानुसार शरीराचा ऱ्हास होणारच. कारण शरीर नाशवंत आहे. योगी निसर्गानियमा विरुद्ध अजिबात जात नाहीत. किंबहुना योगी निसर्ग नियमाला अनुसरुन व निसर्गाला कुठलाही भुर्दंड न बसवता जगतात. कृष्णाने गीतेत स्थितप्रज्ञाची लक्षण सांगतांना म्हंटले आहे, योगी झाडावरची फळ खाऊन भूक भागवतांना नुसता पोटाचा व भूकेचा विचार करत नाही. तो त्या झाडाचा देखील विचार करतो. तो आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करतच नाही. मात्र आवश्यकतेतही तो निसर्गाचा ऱ्हास टाळतो. कारण योगी हा स्वतःच्या वर व पलिकडे जाऊन विश्वाचा विचार करतो. तर असा हा निसर्ग नियम प्रेमी स्वतःच्या शरीराबाबतीत निसर्गाशी प्रतारणा कसा काय करेल? माझ्या मते योगी योगविद्येव्दारे शरीराचा क्षय कमीतकमी करतो. जरी शरीर वरवर मांसाचा गोळा असले तरी जे आतलं चैतन्य त्या शरीराचा सारथी आहे ते चिरतरुण आहे. त्याची कास धरुन तो शरीराचा क्षय जवळपास नाहीसा करतो. योगी शरीराचे पुनर्जीवन तसेच शक्तीचं पुनर्भरण करु शकतो. योग्याच्या शरीराभोवती त्याच्या साधनेचे व शक्तीचे वलय असते. ते वलय त्याची सिद्धी अबाधित ठेवते. ह्या वलयामुळे त्यांच्या मनाला व शरीराला आराम करण्याची कमीतकमी गरज भासते. कारण योगीचे शरीर त्यांच्या कार्यातुनच उर्जा मिळवतात. हा उर्जेचा प्रवास योगी कसा हाताळतात हे आपण समजवुन घेऊत. 
सामान्य मनुष्य जेव्हा कुठलेही कार्य करतो, जसे घरकाम, बागकाम किंवा सामानाची खरेदी, यात तो सहजरित्या थकतो. अश्या कामातून थकणे हे आपण नैसर्गिक मानतो. परंतु जेव्हा एक योगी ही कामे करतो, तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व तेवढेच टवटवित, प्रफुल्ल, उर्जित असते. शरीराला थोडा थकवा आला जरी असेल तरी त्याची एकुण उर्जा अबाधित असते. त्यामागचे कारण नक्कीच योग्याची कार्यशैली असली पाहीजे. प्रत्येक कार्याचे निर्वहन करतांना, योगी त्याचे शरीर, इंद्रीय, मन, बुद्धी, आत्मा यात एकसुत्रता आणतो. या सर्वांचा योग करत तो प्रत्येक कार्य तडीस नेतो. जेव्हा तुमच्या व्यक्तित्वातील सर्व अंग (इंद्रीय, शरीर, मन, बुद्धी, आत्मा) एकरूप होतात तेव्हा तुम्ही हातात घेतलेल्या कार्यात एकरूप होतात. त्या कार्याशी समरस होतात. ती समरसता सर्व बाजुने असते. वैचारीक, शारीरीक, मानसिक तसेच अध्यात्मिक पातळींवर ही समरसता, व योग घडत असतो. आता विचार करा, सर्वोच्च ध्यानाची परिभाषा तरी काय आहे? शरीर, मन, बुद्धी व आत्मा ह्यांचे एकमेकांना पूरक व समरस होणे. ह्याचाच अर्थ योगी प्रत्येक कार्यात ध्यान करत असतो. किंवा त्याची मानसिक स्थिती ध्यानाची असते असे आपण म्हणुया. योग्यास ध्यानासाठी डोळे बंद करुन, पद्मासनात दूर जंगलात बसणे आवश्यक नसते. तसे जंगलात पद्मासनात डोळे बंद करुन ध्यान केल्याचे फायदे आहेतच. आणि त्या मार्गात प्रगती कदाचित जास्त ही होत असेल. परंतु तश्याच वातावरणात ध्यान झाले पाहीजे ही अट योग्यांना लागु होत नाही. कारण त्याची साधना ध्यान अविरत चालु असते. अगदी प्रत्येक कामात गुंतलेला असतांना देखील हे ध्यान चालुच असते. प्रत्येक संवादात व अभ्यासात योग्याची एकाग्रता व आकलनक्षमता प्रचंड असते. ध्यानस्थ अवस्थेत उर्जेचा संवेग हा सुगम व विनाअडथळा असतो. हा विना अडथळा शक्तीचा संवेग योग्याच्या कार्यात माहीती, ज्ञान, शांती ही विनारोध प्रवाहीत करतो. हा असा शक्तीचा प्रवाह तुम्हाला अनुनाद (रेसोनान्स) या प्रक्रियेत प्रस्थापित करतो. अनुनादचा अर्थ एखाद्या नादामध्ये समरस/एकरूप होणे. इंग्रजीत त्याला matching frequency असे म्हणतात. परंतु योगाभ्यासात त्याला उर्जेचा किंवा शक्तीचा योग (union of energy) म्हणतात. हा योग तुमच्या भोवतालच्या वलयाचा, विचारांचा, भावनांचा, शरीराचा व क्रियेचा होतो. तुम्ही जर एखाद्या कार्यात एकाग्र, एकजीव, समरस झाला आहात, त्या कार्यात पुर्णपणे बुडुन गेला आहात तर तुम्ही अनुनाद साधला असे म्हणता येईल. आपण अनुनाद साधला आहे का ह्याची पडताळणी करायचे काही सोपे मार्ग आहेत. अनुनाद साधल्यावर तुम्हाला वेळेचे भान राहात नाही. अनेकदा कार्यात बुडुन गेल्यावर तुमच्या सभोवतीच्या वातावरणाचा विसर पडतो. शारीरीक कष्टाचा व अडचणीचा देखील विसर पडतो. तहानभूकेचा विसर पडतो. सभोवताली होणारा आवाज ऐकु येत नाही. एक महत्वाचे चिन्ह म्हणजे जेव्हा तुम्ही कार्य संपवतात किंवा त्या कृतीतून बाहेर पडतात, तुमची शक्ती व्दिगुणीत होते. चैतन्य व उर्जा अबाधित राहाते. त्याचा हा एक अर्थ आहे की कार्यात तुमचा गेलेला वेळ आनंदात गेला. काही कृतीत शरीर भले थकले असेल परंतु उर्जा व उत्साह कायम असेल. त्यामुळे योगी एका कामानंतर दुसऱ्या कामास अथक परिश्रम व एकाग्रतेने करीत तडीस नेतात. ती एकाग्रता साधनेतून येते. त्या साधनेत एक महत्वाचे अंग आहे ज्याचे योगी सतत चिंतन करतात. ते म्हणजे प्रत्येक कार्यात स्वत्वाचा भंग करणे. स्वत्व विसरणे. उदा: एखादा रिसेप्शनिस्टचा जाॅब करतांना तुम्ही स्वतःच्या घरच्या अडचणी व शारीरीक व्याधी यांना विसरुन प्रत्येकाचे प्रसन्न मनाने स्वागत करणे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपलेसे करणे व हवी ती मदत करणे हे तुमचे आद्य कर्तव्य असले पाहीजे. इतर सर्व गोष्टींचा विसर पडला पाहीजे. आणखी एक प्रसंग म्हणजे शाळेत मुलांना शिकवणारा शिक्षक हा जर पुर्णपणे कथानकाशी समरस होऊन व त्या गोष्टीतला एक नट होत असेल तर शिकवण्यातील एकरूपता ही उच्चकोटीची होईल. विद्यार्थी व शिक्षक दोघांमध्ये एक शिकवण्या विषयी ओढ निर्माण होईल.गायक जेव्हा तासनतास एक राग आळवुन सराव करतो तेव्हा त्याचा सुर, इतर वाद्य एकजीव होतात, त्या परिश्रमातुन गायक मात्र तेजाळुन, प्रफुल्लीत होऊन निघतो. त्या सुरांच्या आराधनेत गायक स्वत्व विसरतो तेव्हाच हा अनुभव प्राप्त होतो. अशाप्रकारच्या वृत्तीमुळे अनुनाद (रेझोनान्स) तयार होतो. आणी मग प्रत्येक कार्यात तुम्हाला ध्यान केल्याचा अनुभव येतो. तुम्हाला ध्यानासाठी कुठल्याही गोष्टीवर किंवा स्थळावर विसंबून राहावे लागत नाही. ही बाब केवळ ताळमेळ जमवण्या पर्यंत नसते तर सर्व बाबींची एकरूपता किंवा योग करण्याची गरज असते. सैनिक जेव्हा मार्चिंग करत असतात किंवा पक्षी वेगवेगळे आकार करुन आकाशात बागडतात, तेव्हा हाच समरसपणा, एकरूपता दिसते. परंतु योगी मात्र ह्याच्याही पलीकडे जातो. तो एकटा असला तरी तो मन, बुद्धी, आत्मा व शरीर , याची एकरुपता साधतो. कार्याशी एकरुपता साधली की तुम्हाला ध्यानाचा अनुभव येतो. म्हणुन योग्याला ध्यानासाठी वेगळ्या सामग्री किंवा वातावरणाची गरज नाही पडत. जेव्हा योगी कार्यात परमोच्च अवस्थेत जातो, तेव्हा तो रेझोनान्स साधतो. आणी ते कार्य एफर्टलेस (शक्तीचा अपव्यय न करता) पद्धतीने संपवतो. शक्तीचा व्यय कमी होतो. म्हणुन ट्रॅडीशनल पद्धतीने केलेले कार्य सामान्य मनुष्यास थकवते. परंतु तेच कार्य योगपद्धतीने केले तर शक्तीचे अखंड स्त्रोत तुम्हाला गवसतात. अशाप्रकारे शक्तीचा उलगडा करणारे सर्व धागे जुळून आले आणी आपण जाणले की रेझोनान्स हा शक्तीचा गुणाकार करतो. म्हणुन योगी सतत चैतन्याने प्रभावित व ओतप्रोत असतात. लेखाच्या शेवटी रेझोनान्सवर आधारीत तिन छोट्या गोष्टी व सामान्य जिवनात योगशक्ती मिळवण्याचे काही उपाय ठेवत लेखास पुर्णविराम देऊ या. 
स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरीकेत गेले तेव्हा तिथे त्यांचे विद्यार्थ्यी त्यांना एका शेतात घेऊन गेले. तिथे सर्व नेम लावण्याची स्पर्धा खेळत होते. सर्वांनी आग्रह केल्यावर, स्वामीजी देखील तयार झाले. स्वामीजींनी बंदुकीचा चाप ओढला आणी त्यांचा लागलेला अचूक निशाणा पाहुन सर्व आश्चर्यचकित झाले. निशानेबाजीत पुर्वीचा अनुभव आहे का याची विचारणा करता स्वामीजी उत्तरले: “मी बंदुक आयुष्यात पहील्याच वेळी हातात धरली आहे.” यांवर मात्र कोणाचाच विश्वास बसेना. स्वामीजींना परत निशाना लावण्यास विनंती केली. स्वामीजींनी पुन्हा बंदूकीचा चाप ओढला आणी गोळी पुन्हा अचूक निशाण्यावर लागली. दोन्ही वेळेस अचूक भेदले गेलेले वार पाहुन सर्वांनी स्वामीजींना याचे रहस्य विचारले. त्यावर स्वामीजींनी त्यांची योगसाधना हे रहस्य सांगीतले. योगसाधना त्यांना स्वत्व विसरुन कार्यात एकरुप होऊ देते. मग इतर कसलेही भान राहात नाही व नेम अचूक लागतो. 
आळंदीत विसोबा नावाचा कर्मठ ज्ञानदेवांचा विरोध करत होता. त्याने कुभांरांना ज्ञानदेवास मातीची भांडी न देण्याबाबतीत सज्जड दम दिला. ज्ञानेश्वरांच्या भावंडांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्या प्रबळ इच्छेखातर भांड्यांच्या अभावी, ज्ञानदेवांनी स्वतःची पाठ योगशक्तीने तापवली व त्यावर मुक्ताबाईने मांडे केले. ज्ञानेश्वर महान योगी होते. त्याच्या साधनेतुन प्राप्त झालेल्या शक्तीचा परिचय आपल्याला त्यांच्या अनेक कथांमधून दिसतो. मात्र मिळवलेली शक्ती ही तुमच्या कर्मानुसार गुणाकार करत जाते. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांच्या चैतन्यरुपी शक्तीचा आळंदीत अजुनही वास व प्रभाव जाणवतो. हा योग शक्तीचा अनाकलनीय परिचय आहे.
एकदा विवेकानंदांना आजारी असतांना त्यांचे शिष्य शरदचंद्र भेटण्यास आले होते. विवेकानंद ब्रिटानियाच्या १२ एनसायक्लोपिडीयाचे वाचन करीत होते. ते पाहाता, शरदचंद्र म्हणाले “हा एनसायक्लोपिडीया वाचायलाच कीती तरी आयुष्य लागतील. हे एका आयुष्यात संपणारं काम नाही”. यांवर विवेकानंदांनी सांगितले “मी दहा खंड संपवलेत. हवेतर माझी परिक्षा घेण्यासाठी यातील काहीही प्रश्न विचार. पुढली दोन खंड ह्या आठवड्यात पुर्ण होतीलच.” विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देत विवेकानंदानी शरदचंद्रांना आश्चर्याचा धक्का दिला. नंतर विवेचन वाचतांना विवेकानंदांचे वाचनात ध्यान लागणे व एकरुप होत ज्ञान आत्मसात करणे हे अनेक ठिकाणी आढळते. 
वरील सर्व घटनांमधे ज्ञानेश्वर असोत वा विवेकानंद. प्रत्येकाने अनुनाद (रेझोनान्स) साधल्याने विवेकानंदांचा नेम लागला किंवा ज्ञानेश्वरांच्या पाठीत मांडे भाजण्याएवढी उर्जा निर्माण झाली अथवा विवेकानंदांनी अख्ख्या एनसायक्लोपिडीयाचे ज्ञान सहज ग्रहण केले हे साहाजिकच होते. हा तोच रेझोनान्स जो आपण ह्या लेखात चर्चेत घेतला. ही तीच शक्तीचा गुणाकार करण्याची योगी प्रवृत्ती, जीचा आपण मतितार्थ समजवुन घेतला.

शेवटी, या शक्तीच्या गुणाकाराकरीता, काही सर्वसामान्यांसाठी असलेले मार्ग उध्रुत करुया. आपण छंद जोपासले पाहीजेत. जिथे आपण आपले चित्त एकाग्र करुन स्वतःला कार्यात एकरुप होण्याची सवय लावु शकतो. दुसरे म्हणजे सामाजिक कार्यात स्वतःचा मीपणा बाजुला ठेऊन कार्य करणे. श्रेय न घेता कार्यरत असणे. जमेल तसे, दिवसभरातील केलेल्या कामाचे तसेच घटनांचे देवाला समर्पण करणे. दिवसभरातील मिळवलेल्या सिद्धी, विकार, भावनांचे आघात किंवा आनंद या सर्व ईश्वर चरणी अर्पण करणे. कुठल्याही कामात पुर्णपणे मग्न असणे. त्यात मोबाईल, टिव्ही, कुठलाही व्यत्यय येऊ न देणे. मनाला वाचनाची आवड निर्माण करणे. कारण वाचनात मनुष्य एकटा असतो व तिथे विचारांचे चक्र योग्य दिशेस वळविण्याचे सामर्थ्य असते. असे काही प्रयोग दैनंदिन जिवनात करत आपण काही प्रमाणात शक्तीच्या गुणाकाराचा अनुभव घेऊ शकता. मात्र तृप्त अनुभवासाठी योगशिक्षणातील अ ते ज्ञ आत्मसात केलेच पाहीजेत. तिथे केवळ आसनं करुन भागणार नाही. चला तर मग आपणही ह्या शक्तीची आराधना करुन योगमार्गे तिचा गुणाकार करुया. 

राहुल करुरकर
karurkar@gmail.com
+४४-७९८९१६५६६९
लंडन

No comments:

Post a Comment