Monday, 12 October 2020

पितृशोक

माझे वडील १९८४ साली मी सहा वर्षाचा असतांना धनुर्वाताने मृत्यु पावले. माझी लहान बहीण १.५ वर्षांची होती. आई २३ व्या वर्षी विधवा झाली. त्यानंतर अशी अनेक दुःख आली जी कुठेच व्यक्त करु शकत नाही. त्या जखमा अजुनही मन उद्गविन्न करतात. माझी लहानपणीची मनस्थिती व वडीलांच्या मृत्युने माझ्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम मांडला आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी बाप गमावणे हे प्रचंड डोईजड दुःख असते. तो मुलगा रडतो. परंतु त्याला मृत्यु हा कायम स्वरुपी आहे हे कळत नसते. कारण त्याला मुळात मृत्यु कळत नसतो. तो रडतो कारण त्याच्या सभोवती सर्व आक्रोशात रडत असतात. ती भावना त्याला दुर्दैवी परिस्थितीत स्वतःशीच झगडायला लावते, कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी. हंबरडा फोडुन मोकळा करण्यासाठी. त्या बालकास मृत्यु येण्याची प्रक्रिया किंवा आजार व त्यातुन त्याचे मृत्युत होणारे रुपांतर कळत नसते. त्याची समज मृत्यु नंतर होणाऱ्या अंत्ययात्रेस समजण्याइतपत देखील नसते. सतत गतीशील असलेला बाप हालचाल न करणारा निपचित पडलेला पाहुन त्याच्या कोवळ्या मनाला मोठा धक्का बसतो. पुर्वी ज्या सर्व गोष्टीसाठी तो वडीलांच्या दिशेने पाहायचा, पळायचा, त्यासाठी आता कुठे पाहायचे, पळायचे हे न कळणे काळीज पिळवटुन काढते. त्याची आई दुःखांचे सांत्वन करण्यापलीकडे गेलेली असते आणि वडील कुठेही दिसत नाहीत. ही परिस्थिति पाहुन ते पोर त्याच्या मनाचे दार घट्ट लावुन घेतो. त्याचे डोळे त्या अंधारलेल्या मनात काहीतरी शोधत असतात. मात्र नेमके काय शोधतोय, हे त्याचे त्यालाच माहीती नसते. ते पोरं त्याला पडलेले प्रश्न अपरिपक्व मनाची मदत घेत सोडवायचा प्रयत्न करते. वडीलांच्या जुन्या आठवणींचा ओघळ त्याच्या मनावर व गालावर येतो. असेही आता वडीलांच्या नविन काही आठवणी तयार होणार नसतात. त्यातच वडीलांच्या मृत्युनंतर त्याच घरात राहणे अशक्य असल्याने त्याचे घर, शाळा बदलते. त्या घटना त्याला अजुन असुरक्षिततेची भावना व स्वभावात चिडचिड देतात. आयुष्यात एक श्वास सोडला तर कुठल्याही गोष्टींवर नियंत्रण राहीलेले नसते. डोळेही परवानगी न घेता वाहतात. त्याच्या आईची मांडी लहान बहीणीस सांभाळण्यात गुंतलेली असते. आणि ते पोरं वयाच्या ६ व्या वर्षी प्रौढत्वाचे ओझे वाहते. त्याच्या मनात एका प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. जो सतत त्याला स्वताःत काही तरी कमतरता आहे हे बोचत असतो. ती अशी कमतरता की ज्यात त्याचा काही दोष नाही.  त्याची चोहोबाजुला असणाऱ्या गोष्टींवर श्रद्धा जमायला लागते. परंतु त्याला हे ही सतत जाणवत असते की ही श्रद्धा खुप पोकळ आहे. आपल्या आयुष्याबद्दलच्या आत्मविश्वासाएवढीच पोकळ. तो पोकळ आत्मविश्वास, जो त्याच्या वडीलांच्या आयुष्याबाबतीत सर्वांना होता व फोल ठरला. ते सलणारे दुःख, अगदी लहानपणी पळतांनाही पायाला कुणीतरी ओझे बांधले आहे ही भावना देते.  त्याने कठोर परिश्रमाने अभ्यास केला परंतु त्याला जाणिव होत होती की क्षमता कुठेतरी कमी पडत आहे. जेव्हा पुढे जाण्यासाठी उचललेले प्रत्येक पाऊल त्याला एका कमतरतेची जाणिव करुन देते तेव्हा ती प्रगती अजुन अवघड होत जाते. मग ती कमतरता भरुन काढण्याचा तो अजुन कष्ट करुन प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांना कधी यश येते तर कधी अपयश. परंतु त्या प्रयत्नात त्याच्या आयुष्यात पडलेल्या भगदाडाला, पोकळीला न भरुन काढता फक्त वरवर लिंपणे सुरु होते. ते लिंपण काही प्रमाणात दुःखावर फुंकर घालत असते. प्रत्येक येणारे यश त्याच्या मनाला थोडी सुखाची झालर लावते. पण ती पोकळी, भगदाड कशानेच भरुन निघत नाही. मोठा होतांना भावंडांपुढे चांगले उदाहरण बनण्याचे ओझे नेहेमी त्याच्या डोक्यावर राहाते. त्यामुळे वागण्यातुन त्याला वेगळं राहावे लागते. त्या वागण्यातुन त्याच्या व्यक्तिमत्वास रुप येते परंतु ती आतली पोकळी सदैव कमजोरीची जाणीव मनाला देते. त्याच्यातले लहान मुल, बालपण हे निखळून पडते. मग तो त्या भावनावेगाचा उपयोग स्वतःला सतत पेटते ठेवण्यास करतो. परंतु समाज त्याच्यावर दयेचे ओझे टाकत असतो. त्यातुन बाहेर येणे अवघड जाते कारण दयेच्या ओझ्यातुन  केवळ victim शोषीत पिडीत तयार होतात. दयाभाव तुम्हाला परिस्थिति नियंत्रणाबाहेर आहे हे दर्शवते तर प्रेरणा परिस्थिति वर विजय मिळवण्यासाठी झगडायला शिकवतात. लोकांनी  त्याच्याप्रती दाखवलेला  दयाभाव त्याच्यातील आत्मविश्वासाला छिद्र पाडतो.  मग तो स्वतःला स्वतःपासुन लपवण्याचा प्रयत्न करतो. आणि जगासाठी स्वतःचे वेगळे चित्र रंगवतो. जेणे करुन इतरांना त्याच्या परिस्थितीची जाणिव होणार नाही.  त्याला माहीती नसते की कुठलेही औषध, अगदी काळदेखील, ही जखम भरु शकणार नाही. कदाचित जखम भरेल पण निर्माण झालेली पोकळी नक्कीच भरुन निघणार नाही. त्याचे ते कोवळं वय त्याला पोकळी ना त्यावरील औषध, कशाचीच समज देत नाही. त्याचे आयुष्याच्या मार्गावर पुढचे पाऊल टाकणे चालु असते. मात्र कुठलेही ध्येयाचे ठिकाण समोर नसते. एका मागोमाग मैलाचे दगड पार करणे हेच अव्याहत चालु असते. त्याच्या नजरेसमोर येणारी वडिलांचा हात धरुन चालणारी लहान मुले देखील त्या पोकळीची आठवण करुन देण्यास पुरेसे ठरतात. त्याला आठवण करुन देतात की आता त्याच्या चुकांची जबाबदारी घेणारा कुणीही नाही. त्याने केलेल्या चुकांपासुन काय व कसे शिकायचे हे सांगणारा आता नाही. धावण्याच्या स्पर्धेत आकांत करुन पळत पहीला नंबर जरी आला तरी आनंदाने  व अभिमानाने उचलणारा कोणी नाही.  संकटात कसे लढायचे हे बोट धरुन शिकवणारा तो बापाचा बळकट हात  कुठेही नाही. स्वतःला सावरण्यासाठी तो हात स्वतःलाच बनायचा आहे. ती कणखर प्रवृत्ती आतुन उपजते. सकारात्मक प्रवृत्ती असलेली मुले सुधारतात व नकारात्मक वृत्ती असलेले रसातळाला जात आयुष्याची माती करतात. जगतांना त्याला नेहेमी जाणवत असते की मिळालेल्या यशात बिकट परिस्थितीचा फार मोठा वाटा आहे. त्यातुन काबाडकष्ट करत अभ्यासाची सवय लागते. प्रारब्धाने जे नाकारले ते परिश्रमातुन साकारण्याचे यत्न सुरु होतात. या प्रयत्नात प्रत्येक वेळी पोटात कळ चमकुन काहीतरी हरवल्याची आठवण करत असते. त्याला छोट्यातली छोटी गोष्ट देखील रडायला भाग पडेल इतके हळुवार भावनीक मन होते. कधी रडु कोसळेल याचे अंदाज बांधणे अवघड होते. अश्रुंमागचे  खरे कारण व जखम जी कधीच भरुन येणार नाही ती त्याला समजते पण उमजत नाही. जेव्हा तो नसलेल्या वडीलांवरच्या आधार पलिकडे जात मोठा होतो, तेव्हा ती जखम त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. ती जखम आता क्वचितच रक्त भळभळणारी किंवा खुपणारी होते. 

जेव्हा तो स्वतः एका मुलाचा बाप बनतो तेव्हा ती जुनी जखम पुन्हा नजरेसमोर एका वेगळ्या रुपात येते. तेव्हा तो देवाला शरण जात, त्या पोटी जन्मलेल्या मुलाला कधी स्वतःसारखं अकाली अनाथ, पोरकं नको करुस हेच मागणे मागतो. कारण ते कठिण आयुष्य खचितच जगण्यालायक होतं. 
पण आता ते मिळालेले पितृस्थान त्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवते. मृत्यु हा स्वच्छ सुर्यप्रकाशाइतका अटळ आहे हे मनाला ठाऊक असते, पण जो क्षण जगायचा आहे, तो जगतांना शेवटचा असेल इतका मनसोक्त जगायचा हे मनात निश्चित होत जाते. त्या मनातील एका दुखऱ्या भागाला बऱ्याचदा वाटते की मुलाला त्याच्या बापाशिवाय जगण्यालायक बनवावे. कठोर शिस्तीतुन आत्मनिर्भर करावे. पण त्या मनाला हे देखील ठाऊक असते की वडीलांच्या नसण्याने होणारी पोकळी कधीच न भरुन येणारी असते. त्यासाठी कुठलीही तयारी करणे अशक्य आहे. मुलावर किती काळ छत्र राहील हा निर्णय तो प्रारब्धावर सोडुन, प्रत्येक दिवस मनसोक्त खंतविरहीत जगायला लागतो. चांगल्या आयुष्याकडे वाटचाल करत जगण्याचा अर्थ कळण्यासाठी जगायला लागतो. ते जगणे अविरत चालु राहते. केवळ त्यालाच माहीती असते त्या जगण्याची मोजलेली किंमत, झालेल्या जखमा व त्यातुन भळभळलेले अश्रु.

© Rahul Karurkar

No comments:

Post a Comment