Friday, 10 January 2020

पकोडेपुराण


पकोडे विकणार्यांची आठवण मोदी सरकारने काढली व त्यांचा यथोचित सन्मान केला... त्यावर माझे पकोडे पुराण....


स्वातंत्र्यपुर्व काळातच काय पण पुराणात देखील पकोड्यांचे फार वरचे स्थान आहे. सुदाम्याने कृष्णासाठी पोहे नाही तर पकोडे आणले होते.... परंतु संस्कृतचे प्राकृत आणि मग मराठी होण्यात पकोडे शब्द चेपले आणि त्याचे पोहे झाले. 

शंकराचार्यांनी भजे ग़ोविन्दम हे लिहिलेच मुळी भज्याच्या प्रेमापोटी. रचनेमधे ग़ोविन्दाच्या आधी भज्याचे स्थान आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 

टिळकांनी जळजळीत लेख केसरी मध्ये लिहीले त्यात सर्वात प्रसिद्ध झालेला लेख “सरकारचे पकोडे ठिकाणावर आहेत काय?” हा टंकलेखनात चुक होऊन पकोड्याचे डोकं झाले. नेमकी त्यावेळी प्रिंटरुममध्ये देखील कामगार भजे खात होते. हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. ईंग्रजांनी भज्यांवर बंदी आणल्यावर “भजे खाणे हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि ते मी खाणारच” ह्या लेखातून टिळकांनी सरकारची वामरंध्रातुन भजे खाल्यासारखी हवा काढली होती. ईंग्रजांनी भज्यांवर कर लावल्यावर गांधीजींनी देखील दांडी यात्रा काढून भजे उचलून सरकारचा विरोध केला होता. 

विवेकानंदांनी देखील पकोडे हे राष्ट्रनिर्माणाचे हत्यार आहे असे उद्गार काढले होते. “उठा, भजे खा, आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्याला लागा.” आणखी एका सदग्रुहस्थांनी सांगीतलेच आहे की “तूच तूझ्या भज्यांचा शिल्पकार.”.....


इंदिरा गांधींनी जरी पकोड्यांचे व चहाचे राष्ट्रियकरण केले तरी सर्वांच्या घरात पकोडे आणि चहा पोहोचला तो जनभजेचहा योजनेतूनच. आज चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला आहे, उद्या भजेवाल्याचा झाल्याशिवाय रहाणार नाही. हे कळाल्यावर, राहुल गांधी या युवकाने भज्याचे दुकान ७ रेसकोर्स रोडवर टाकले असे पर्वा भजे बांधुन दिलेल्या पेपरात वाचले. मोदींनी मुसलमानांसाठी एका हातात कुराण आणि दुसऱ्याहातात बाँम्बच्या ऐवजी भजे घ्या असे सांगुन आपली कळवळ व्यक्त केली. भजे खाऊन (पोटात तयार) होणारा मानवी बाँम्ब हा समाजाचे नुक़सान अजीबात करत नाही तर रोजगारच वाढवतो.

.... इतिहासातून थेट जर तुम्ही वर्तमानात आले तर लक्षात येईल की भले तुमचे अपत्य इंजीनीयर, डाॅक्टर वा कुठलाही पदवीधर होवो.... त्याच्या काॅलेजातल्या आठवणी ह्या चहा किंवा भज्याच्या टपरीवरील अधिक खोलवर जातात.... बाकी कुठला विषय लक्षात राहील न राहील, पण त्या गाड्यांवरची भजी आणि चहा ह्यांचा समागम झाल्यावर घडणाऱ्या गप्पा आणि लागणारी तंद्री, पाहीले जाणारे स्वप्न, दररोज घडणारे प्लान... होणारी आणि चहावर मीटणारी भांडणं...अहाहा तो मार्ग भज्यांवरुन सरळ समाधीत कडे जातो. अगदी ओशोंनी त्यांच्या “पकोड्यातुन समाधीकडे” या पुस्तकात सांगीतले तसे..... नाही नाही.... तो भजीवाला भजी किंवा पकोडे नाही विकत.... तो बिझनेस देखील नाही करत..... तो निख्खळ आनंदाच्या आणि आठवणींच्या प्लेटस वाटत असतो....अगदी माफक दरात.....


त्यामुळे भज्यांना राष्ट्रीय पदार्थांचा मान दिला पाहीजे. आणि असा ब्रम्हानंद (पकोडे, भजे) स्वस्तात विकणाऱ्याला कोण, कसा आणि का हिणवणार.....? 


चला तर मग आपण भजे खाऊन राष्ट्रनिर्माणाला लागुया!


आपला भजेप्रेमी

राहुल करुरकर

No comments:

Post a Comment